Paradhin Aahe Jagtin Putra Manvacha

Paradhin Aahe Jagtin Putra Manvacha

Sudhir Phadke

Длительность: 10:51
Год: 1965
Скачать MP3

Текст песни

श्रीरामचंद्रांना सावधान अशी सूचना देणारा लक्ष्मण
जेव्हा स्वतःहाच भरतावर संतापणे धावून जाऊ लागला
तेव्हा श्रीरामाने परत त्याला शांत केलं
भरत रामाश्रमामध्ये आला
वेड्यासारखी त्याने रामाच्या चरणांना मिठी घातली
रामाने त्याला जवळ घेतला पुष्कळ प्रश्न विचारले
भांबावून गेलेल्या भरतानी मोठ्या कष्टाने
पित्याच्या निधनाची वार्ता त्यांना सांगितली
सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली
यथाकाळी श्रीरामाने वडिलांचे श्राद्ध केलं
आणि आता भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला
रामा माझ्या आईच्या मूढपणामुळं
आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे
तुम्हाला वनवासी व्हावं लागलं
राज्य तुमचं आहे सिंहासन तुमचं आहे
आपण अयोध्याला परत चला
राज्याभिषेक करून घ्या
तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले

दैवजात दुःखें भरतां दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

जिवासवें जन्मे मृत्यू जोड जन्मजात
दिसे भासते तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या स्वपिंच्या फळांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

तात स्वर्गवासी झाले बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

नको आंसु ढाळूं आतां पूस लोचनांस
नको आंसु ढाळूं आतां पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा रंक मी वनींचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं कां वेष तापसाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार
संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें सत्य हें त्रिवार
सत्य हें त्रिवार सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा